बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी अपशब्द वापरल्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राज्यभर रोष व्यक्त केला जात आहे. बीड जिल्ह्यामध्येही याचे पडसाद उमटल्याचे दिसत आहे. आज (गुरुवार) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आमदार पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजीमुळे बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. बीडबरोबरच जिल्ह्यातील गेवराई, परळी तसेच केज तालुक्यातही ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनील धांडे, भाऊसाहेब डावकर, पंकज बाहेगव्हाणकर, हनुमंत वाघमारे आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रातील जनता व राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी काढलेले अपशब्द कधीही खपवून घेणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.