बीड - 52 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा जेव्हा विधानसभा निवडणूक लढवत होतो, तेव्हा मला यशवंतराव चव्हाण यांनी संधी दिली. त्यावेळेस तरुणांना संधी का देता हा विषय समोर आला होता. त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, मला पुढच्या पंचवीस वर्षांचा कारभार सुरळीत करायचा आहे, म्हणून मी तरुणांना संधी देत आहे. आता मी देखील तोच धागा पकडून पुन्हा वयाच्या या टप्प्यावर सांगू इच्छितो की, मला हा महाराष्ट्र तरुणांच्या हाती द्यायचा आहे. म्हणून मी गेवराई विधानसभा मतदारसंघात तरुण व तडफदार नेतृत्व म्हणून विजयसिंह पंडित यांना उमेदवारी दिली आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेवराई येथे आयोजित प्रचार सभेत सांगितले.
यावेळी मंचावर माजी मंत्री शिवाजीराव पंडित, माजी आमदार उषा दराडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, गेवराई विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजयसिंह पंडित, बीडचे उमेदवार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सुनील धांडे, माजी आमदार सलीम सय्यद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेबूब शेख, भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले कल्याण आखाडे, अर्जुन राठोड, बाबुराव पोटभरे यांची उपस्थिती होती. यावेळी गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.
हेही वाचा - 'दोन्ही पैलवान तोलामोलाचे असल्याशिवाय कुस्तीत मजा येत नाही'
महाराष्ट्रासाठी काय केले हे विचारण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या जनतेला, शाहांना नाही
भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे यांचा शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात आला. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, माझी जबाबदारी म्हणून मी बीड जिल्ह्यात तरुण उमेदवारांना संधी दिलेली आहे. या पुढच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा आहे. मतांचा जोगवा मागणाऱ्या भाजप सरकारला महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या जनतेला अमित शाह यांचे नाव तरी माहिती होते का? आणि तेच शाह आज आम्हाला विचारतात तुम्ही काय केले? आम्ही महाराष्ट्रासाठी काय केले हे विचारण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. अमित शाहांना नाही, असा टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला.
गेवराईकरांनो मला आशीर्वाद द्या - विजयसिंह पंडित
आज घडीला हा देश वाईट परिस्थितीतून जात आहे. धर्मांध विचारांच्या सरकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलण्याचा डाव आखला जात आहे. तो थांबवायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा द्या, गेवराईकरांनो मला आशीर्वाद द्या, मी गेवराईच्या एमआयडीसीसह गेवराई तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावेल असा, विश्वास गेवराई विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी उपस्थित जनतेला दिला.
हेही वाचा - 'कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र'