बीड - जिल्ह्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. कायदा व सुव्यवस्था देखील धोक्यात आली आहे. सरकारमधील मंत्र्यांचा सरकारमधील मंत्र्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. जिल्ह्यातील दोन मंत्र्यांमधील संघर्षामुळे बीडचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे १५-१५ दिवस रजेवर जातात. परिणामी जिल्ह्याच्या कामकाजावर विपरीत परिणाम होतो, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आमदार जयदत्त क्षीरसागर आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
शहरात शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. सरकारमधील मंत्र्यांचा प्रशासनावर वचक राहिला नाही. सर्वसामान्यांची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत. मात्र, जिल्ह्यातील महत्त्वाचे अधिकारी जिल्ह्यात हजर नसतात. त्यामुळे अनेक फाईल्स मार्गी लागत नाहीत. ही सगळी वस्तुस्थिती जिल्ह्यातील जनतेला लक्षात आली आहे. एवढेच नाहीतर भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातले सरकार आहे. महाजनादेश यात्रा निघाली तेव्हा यात्रेतून कोण रुसून गेले होते? असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.