पुणे - ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर ( Bandatatya Karadkar ) यांनी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना राजकीय नेत्यांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ( Banda Tatya Karad Controversial Statemet ) भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांचा उल्लेख करताना बंडातात्या कराडकर यांनी सर्वच राजकीय नेत्यांची मुले दारू पीत असल्याचे सांगत पुरावे असल्याचाही दावा केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर येऊन पडत असता त्यांनी याचेदेखील पुरावे असल्याचं म्हटले आहे.
हेही वाचा - Amruta Fadanvis : स्त्रीयांच्या खाजगी आयुष्यावर टिप्पणी करणे योग्य नाही - अमृता फडणवीस
बंडातात्या कराडकर ही वारकरी संप्रदायाला लागलेली कीड -
बंडातात्या कराडकर यांनी जे काही वक्तव्य केलं आहे अतिशय निषेधार्ह आहे. हा सबंध महाराष्ट्रातील महिलांचा अपमान आहे. बंडातात्या कराडकर ही वारकरी संप्रदायाला लागलेली कीड आहे. ही कीड बाजूला काढली पाहिजे. अनेक वेळा बंडातात्या कराडकर यांच्या माध्यमातून काहीही वक्तव्य केले जात आहे. त्याचा बोलता धनी हा आरएसएस आणि भाजप आहे. त्यांनी वेळेतच त्यांच्यात सुधार करावी अन्यथा येणाऱ्या काळात त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देण्यात आला आहे.
बंडातात्या विरोधात बीडमध्ये तक्रार दाखल; भाजप कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
बंडातात्या कराडकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून बीडमध्ये भाजप आक्रमक झाली आहे. बीडच्या पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी बंडातात्या कराड विरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, जोपर्यंत बंडातात्या कराड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार असून या ठिकाणाहून उठणार नाहीत, असा पवित्रा भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतला आहे.