बीड - पाटोदा तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी पाहण्यास मिळाली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी रोहतवाडीचे सरपंच पांडुरंग नागरगोजे यांना बेदम मारहाण केली घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेबाबत पांडुरंग नागरगोजे यांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पांडुरंग नागरगोजे हे पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी गावचे भाजपचे सरपंच आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे काम का करतो, असा जाब विचारून खुर्ची आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणारे कार्यकर्ते हे धनंजय मुंडे यांचे समर्थक असल्याचा आरोप पांडुरंग नागरगोजे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांच्याबद्दल चुकीची पोस्ट टाकली होती, म्हणून मारहाण करण्यात आली, असा दावाही या कार्यकर्त्यांनी फेसबुक पोस्ट टाकून केला आहे. तसेच फेसबुकवर पोस्ट टाकून सरपंच पांडुरंग नागरगोजे यांना धमकीही देण्यात आली आहे.