बीड - आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील उच्चशिक्षित तरूण समीर शेख हा गेल्या सात वर्षांपासून शिवनेरी ने सांगवी पाटण ज्योत घेऊन येत आहे. यामध्यमातून समीर सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देत आहे. तरुणांनी जाती-पातीची बंधने तोडुन एकत्र यावे, असा संदेश आपल्या या उपक्रमातून समीर देत आहे.
पायी ज्योत नेणारा मुस्लिम मावळा -
दरवर्षी समीरसोबत गावातील ५० तरूण शिवनेरीवर जातात. त्याप्रमाणे यावर्षी देखील त्याच्यासोबत गावामधील 50 मावळे गेले होते. शिवनेरी ते सांगवी पाटण हे दोनशे किलोमीटरचे अंतर एक रात्र आणि एका दिवसा पार करून त्यांनी थेट गावामध्ये ज्योत आणली. शिवनेरीहून पायी ज्योत नेणारा समीर हा महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम तरुण आहे. त्यामुळे समीर शेखचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
ज्योत आणण्याचा मान मिळणे भाग्याचे -
शिवरायांचे विचार माझ्या कायम मनात असतात. मी त्यांना माझे दैवत मानतो. शिवरायांच्या महाराष्ट्रात मला ज्योत आणण्याचा मान मिळतो, हे मी माझे भाग्य समजतो. शिवनेरीवर गेल्यानंतरही माझा मान सन्मान करून आमच्या संपूर्ण टिमच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था तेथील लोक करतात. शिवरायांचा मावळा असल्याचा मला अभिमान असून मी कायम पायीज्योत घेऊन येणार असल्याची भावना समीर शेखने व्यक्त केली.
समीर सोबत गावातील अजय मरकड, राघव खिलारे, अमीत गवारे, अनंत खिलारे, अजय वाघमारे, सुमीत भगत, शिवराम खिलारे, अमोल खिलारे, कृष्णा भोसले, शुभम भोसले, रोहीत भोसले, रोहीत मरकड, अकुंश फुलमाळी, अक्षय खिलारे, हरि खिलारे, तुषार खिलारे, हरी भोसले यांच्यासह एकूण पन्नास मावळे शिवनेरीवर गेले होते.