बीड - वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केली. आज शाहू महाराजांच्या जयंतीदिनी त्याच वंचित उपेक्षितांना आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून बहुजन समाजाची दिशाभूल करू पाहत आहे. बहुजन समाज भोळा असला तरी त्याला पंकजा नावाचा तिसरा डोळा आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करा अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा खा.डॉ. प्रितम मुंडे यांनी राज्य सरकारला दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींच्या राजकीय आरक्षण रद्द करण्यात आल्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले होते. परळी शहरातही इटके कॉर्नर चौकात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रदेश भाजपाच्या उपाध्यक्षा खा.डॉ. प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, जुगलकिशोर लोहिया, फुलचंद कराड, दत्ताप्पा इटके, निळकंठ चाटे, पवन मुंडे, राजेश गित्ते, जयश्री मुंडे, डॉ.शालिनी कराड यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने बहुजन समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी खा.प्रितम मुंडे म्हणाल्या की, आरक्षणाचा लाभ सर्वच पक्षातील ओबीसींना मिळाला. राज्यातील सत्ताधारी देखील आरक्षणामुळे सत्ता उपभोगत आहेत. परंतु आरक्षण रद्द झाल्यानंतर एकाही मंत्री किंवा आमदाराने राजीनामा देण्याची हिंमत दाखवली नाही. राज्यातील मंत्र्यांनी निर्णय घेण्याऐवजी आंदोलनाची भाषा करणे त्यांच्या नाकर्तेपणाचे उदाहरण असल्याचा घणाघात देखील यावेळी त्यांनी केला.
सर्वसामान्यांसाठी पंकजा मुंडे साहेबांच्या भूमिकेत -
सत्ताधाऱ्यांच्या उदासीन धोरणांमुळे जेव्हा सर्वसामान्यांवर अन्याय होत असे तेव्हा मुंडे साहेब त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षाची भूमिका घेत असत. आजदेखील ओबीसींवर अन्याय झाला आहे. या अन्यायाविरोधात लढा उभारून पंकजा मुंडे साहेबांची भूमिका घेतली आहे.
वाहनांच्या लांबच लांब रांगा -
पंकजा मुंडे यांनी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाला परळी तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती. परळीसह तालुक्यातील सिरसाळा, धर्मापुरी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वाहतूक बंद पडली होती. परिणामी रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.