बीड - शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे सोमवारी बीड विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर होते. दरम्यान बीड तालुक्यातील उदंड वडगाव शिवारात चव्हाण यांच्या शेताजवळ आमदार मेटे यांचा ताफा आल्यावर मेटे यांनी अचानक गाडी थांबवली. कापसामध्ये पाळी (औत) मारताना एक शेतकरी दिसला. आमदार मेटे यांनी त्या शेतकऱ्याच्या हातातील बैलांचा कासरा आपल्या हातात घेऊन कापसाची मशागत केली.
आमदार मेटे यांनी या शेतकऱ्यांच्या शेतात केलेली मशागत म्हणजे त्या शेतीची मशागत आहे की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची मशागत आहे, अशी जोरदार चर्चा बीड विधानसभा मतदारसंघात होत आहे. काही महिन्यावरच विधानसभा निवडणुका आल्या आहेत. सर्वच पक्षाचे संभाव्य उमेदवार आपापल्या मतदारसंघात निवडणुकीची पेरणी करत आहेत.
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे महायुतीकडून बीड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा दावा करत आहेत. परंतु, बीडची जागा शिवसेनेची आहे. मात्र, जर शिवसेना-भाजप यांची युती झाली तर ही जागा भाजप घेणार की, शिवसेना याबाबत अद्यापपर्यंत कुठली ही अधिकृत घोषणा भाजप किंवा शिवसेनेकडून झालेली नाही. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड विधानसभा मतदार संघासाठी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आ. विनायक मेटे हे दोघेही मतदारांच्या भेटी-गाठी घेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.