बीड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे गोरगरिबांची उपासमार होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अनेक लोकप्रतिनीधीही आपापल्यापरीने नागरिकांना मदत करत आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील 10 हजार कुटुंबीयांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. बीड शहरातील गरजू नागरिकांना एक महिन्याचे रेशन क्षीरसागर यांनी दिले.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात शासन स्वस्त धान्य गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र, तरीही अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. यामुळे संदिप क्षीरसागर यांनी हातावर पोट असलेल्या गोरगरिबांच्या मदतीसाठी आपली टीम कामाला लावली आहे. बीड तालुक्यातील रेशन कार्ड नसलेल्या गोरगरीब नागरिकांना एका महिन्याचे रेशन दिले. त्यांच्या या उपक्रमामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा हातभार लागला आहे.
रेशन धान्याबरोबर बीड तालुक्यातील निराधारांच्या मानधना संदर्भात देखील ठोस असे निर्णय घेण्यात येणार असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. अशा बिकट परिस्थितीत एक महिन्याचे रेशन मिळाल्याने मोठी चिंता दूर झाली, असे लाभार्थी सोमनाथ काळे, अण्णा शिंदे यांनी सांगितले. यावेळी माजी आ. सय्यद सलीम, सुनील धांडे, उषा दराडे, तहसीलदार किरण आंबेकर हे उपस्थित होते.