बीड - शेतकऱ्यांच्या पीक कर्जासंबंधीच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन गुरुवारी (दि. 16 जुलै) बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अग्रणी बँक प्रमुख यांची आढावा बैठक घेऊन यापुढे एकही बँक शेतकऱ्यांना फेरफार सातबारा व आठ 'अ मागणार नाही. याबाबत सूचना केल्या आहेत. यावेळी शहरातील राजीव गांधी चौकातील एसबीआय कृषी शाखा येथे आमदार क्षीरसागर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांची पीक कर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.
सध्या बीड जिल्ह्यात पिक कर्ज मिळवण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात हेलपाटे मारत आहेत. बँक प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सातबारा आठ अ फेरफारसाठी चकरा मारायला लावले जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. गुरुवारी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शेतकर्यांच्या तक्रारी वरुनच अग्रणी बँकेचे प्रमुख श्रीधर कदम यांच्याबरोबर गुरुवारी आढावा बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या पिक कर्ज संदर्भाने सूचना केल्या आहेत. यावेळी विविध मुद्दे उपस्थित केले असून यामध्ये आतापर्यंत सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी शासनाने दिलेले उद्दिष्ट किती प्रमाणात पूर्ण केले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना बँक प्रशासन पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहे,
याशिवाय शेतकऱ्याने कर्ज प्रकरण प्रस्ताव बँकेत दाखल केल्यानंतर सातबारा आठ अ, फेरफार संबंधित तहसीलदार यांच्याकडून मागवून घेण्याच्या संदर्भाने जिल्ह्यातील सर्व बँकांना सूचना करण्यासंदर्भात अग्रणी बँकेचे प्रमुख श्रीधर कदम यांना सांगितले. याशिवाय बीड शहरातील राजीव गांधी चौकातील एसबीआयच्या कृषी शाखेला आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट देऊन तेथील शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाच्या अडकलेल्या फायली दोन दिवसात मार्गी लावण्यास संदर्भात संबंधित बँक अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
एकंदरीत शेतकऱ्यांना बँकांकडून उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत. या प्रश्नाकडे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी लक्ष द्यावे, यासाठी शेतकऱ्यांनी आमदार क्षीरसागर त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.