बीड - भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली आहे. ते शुक्रवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान बोलत होते. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत पक्षावर निष्ठा ठेवण्यात मी तसूभरही कमी पडलेलो नाही. मात्र, आज माझ्यावर, अशी परिस्थिती ओढवली असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
इच्छा नसतानाही मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या घरातून दारात आणून ठेवले जात आहे. मी पक्षाबाहेर पडावे यासाठी कटकारस्थाने केली जात आहेत, असा आरोपही आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी केला आहे.
बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे झालेल्या आ. जयदत्त क्षीरसागर समर्थकांच्या मेळाव्याप्रसंगी जिल्ह्यातील अनेक नवे, जुने कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये माजलगाव येथील नगराध्यक्ष सहाल चाऊस बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, शेख शफीक, शेषराव फावडे विलास विधाते, दिलीप गोरे, योगेश क्षीरसागर यांच्यासह आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे असंख्य समर्थक उपस्थित होते.
आमदार जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीवर नाराज असल्याने त्यांनी पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमाला दोन वर्षात हजेरी लावली नाही. याशिवाय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचे राजकीय वैर आहे. जिल्ह्यातल्या काही पुढाऱ्यांनी आमचे घर फोडले, असा आरोपदेखील जाहीरपणे जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की, माझी इच्छा नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मला सोडावा लागत आहे. आतापर्यंत पक्षाने दिलेला आदेश पाळण्यामध्ये मी तसूभरही कमी पडलेलो नाही. असे सांगत त्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका कार्यकर्त्यांसमोर जाहीर केली.
माजलगाव तालुक्यात ज्या गावांमध्ये राष्ट्रवादीच्या शाखा होत नव्हत्या त्या गावात मी शाखा स्थापन केल्या. मात्र आज माजलगामधील जे लोक शाखा स्थापन होऊ देत नव्हते तेच आमचे दुर्दैवाने मार्गदर्शक आहेत, असा टोला यावेळी त्यांनी प्रकाश सोळंके यांना मारला.
पक्ष सोडण्याची अधिकृत घोषणा केली नाही
जयदत्त क्षीरसागर यांचा राजकारणातला अनुभव दांडगा आहे. संयम हीच माझी शक्ती आहे. असे सांगत त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुकदेखील केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे जाहीरपणे बोलून दाखवले नाही. माझ्यावर पक्षातील काही लोकांनी कुरघोडी करून पक्षाबाहेर काढण्यासाठी कटकारस्थान केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.