बीड : राज्यात बालविवाह करण्याच्या बाबतीत बीड जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, हा बालविवाह रोखण्याचे तसेच कायद्याची अंमलबजावणी करण्याचे पोलिसांचे आहे. मात्र त्याच पोलिसाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत बालविवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढच नाही तर, अल्पवयीन विवाहिता गरोदर राहिल्यानंतर तिचा खाजगी रुग्णालयातील गोळ्या देऊन गर्भपात केल्याचा देखील आरोप होत आहे. पोलिसाच्या या कृत्यावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करत पाठबळ देण्याचे काम बीडच्या गेवराई पोलिसांनी केले आहे.
काय आहे प्रकार : बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात एकूण 80 बालविवाह रोखण्यात आले आहेत. मात्र, याची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका असणाऱ्या पोलिसानेच बालविवाह केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कसा झाला विवाह : या 17 वर्षीय पीडितेचा बीड पोलीस दलातील एक कर्मचाऱ्यासोबत 18 में 2022 रोजी झाला होता. त्यानंतर सासरच्या मंडळीने पीडितेला एक महिना चांगली वागणुक दिल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यानंतर पतीच्या कुंटूबांने प्लॉट घेण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये घेवून येण्याची मागणी केली. त्यावर पीडितेने आई-वडील गरीब असल्याचे सांगितले. मात्र, इथे रहायचे असेल तर पैसे आणावेच लागतील, असे म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली. हा त्रास वाढतच राहिल्याने ही बाब पीडितेने वडिलांना सांगितली. मुलीला नांदायला पाठवायचे असेल तर, फ्लॉटसाठी 15 लाख रुपये द्या, नाही तर मुलीला पाठवू नका, असा निरोप सासरच्या मंडळींनी दिला. त्यानंतर माहेरी येवून पैसे द्यावेच लागतील असे म्हणून पतीने शिवीगाळ करत मारहाणही केली.
पोलिसांवर प्रश्नचिन्ह : पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन गेवराई पोलीस ठाण्यात 2 जानेवारीला पतीसह सासरच्या 8 जणांवर कलम 498, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही फिर्याद देतानाच पिडीतेने आपले वय 17 असल्याचे नमूद केल आहे. तसे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये देखील 17 वर्ष नमूद आहे. मग हे सर्व असताना संबंधित पोलिसांनी बालविवाहाचा गुन्हा का दाखल केला नाही ? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
बालकल्याण समितीकडे तक्रार : या 17 वर्षीय पीडीतेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत बालकल्याण समितीमध्ये लिखित म्हणणे मांडले आहे. यामध्ये पीडितेने म्हटले आहे की, माझ्या इच्छेविरुद्ध माझा बालविवाह झाला आहे. मी नववीत असताना 7 नोव्हेंबर 2021 रोजी माझा साखरपुडा झाला. त्यावेळी मला काही समजत नव्हते. मात्र, 18 मे 2022 रोजी माझा विवाह सचिन पवार रा. काळेगाव हवेली तांडा याच्याशी लावून दिला. या विवाहाला माझा विरोध होता. त्यानंतर माझ्या पतीने माझ्या सोबत इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मी त्यातून गर्भवती राहिले.
गर्भपात केल्याचा आरोप : त्यानंतर माझ्या पतीने बीडमधील एका हॉस्पिटलमध्ये नेऊन माझी तपासणी करत सोनोग्राफी केली. त्यांनतर त्यांनी मला गोळ्या स्वतःच्या हाताने खाऊ घातल्या. 24 जून 2022 रोजी पुन्हा माझ्या पतीने हॉस्पिटलमध्ये नेले असता, मला पांढरा कावीळ झाल्याचं सांगितले. त्यानंतर माझ्या पतीने मला माहेरी नेऊन सोडले. बालविवाह बाबत, गर्भपाता बाबत कुठेही कसल्याही प्रकारची तक्रार केली, तर माझे काही वाकडे होणार नाही. त्यामुळे माझ्या पतीसह ज्यांनी ज्यांनी माझा बालविवाह लावला त्या सर्वांवर कारवाई करावी अशी, आर्त हाक पीडितेने बालकल्याण समितीला केलेल्या लिखित अर्जातून केली आहे.
बळजबरीने ठेवले लैंगिक संबंध : याविषयी चाईल्डलाईनच्या तत्त्वशील कांबळे यांनी सांगितले की, 16 ते 17 वर्षाच्या मुलीचा बालविवाह झाला आहे. मात्र बालविवाह करणारा हा पोलीस कर्मचारी असल्याने बालविवाहाचा गुन्हा दाखल झालेला नाही. विशेष म्हणजे तिच्यासोबत बळजबरीने लैंगिक संबंध ठेवल्याचे तिने सांगितले आहे. यामध्ये ती गर्भवती राहून तिचा गर्भपात देखील झाल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.
पोलिसांवर गुन्हे दाखल कारा : त्यामुळे या सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. हा बालविवाह असतानाही पोलिसांनी बालविवाहाचा गुन्हा दाखल केला नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी केवळ 498 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कायद्याच्या रक्षकांनीच चुका केल्यामुळे आरोपीला पाठबळ मिळाले आहे. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी चौकशी करुन ठाणे अंमलदालरांवर कारवाई करवाई अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.
पीडिता अल्पवयीन : तर याविषयी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर म्हणाले, की सदर प्रकरणाच्या अनुषंगाने गेवराई पोलीस ठाण्यात 498 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, यामध्ये तपास केला असता काही बाबी निदर्शनास आल्या आहेत. पीडितेच्या आधार कार्डमध्ये तफावत आढळली आहे. पीडितेचा शाळा सोडल्याच्या दाखल्यावर पीडिता अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले आहे.
दोषींवर कारवाई करणार : त्यामुळे पोलीस यंत्रणा कायदेशीर बाबींची पूर्तता करून पुढील कायदेशीर बाबी करत आहे. जर कोणी दोष आढळले तर त्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली आहे. या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दखल घेणार का...? बालविवाह करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नांग्या ठेचुन पीडितेला न्याय देणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच गृह विभागातील अशा बालविवाह करणाऱ्या कर्मचाऱ्या कारवाई करत पीडितेला न्याय देणार का ? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा - Bhima River Suicide: त्या सात जणांची आत्महत्या नव्हे तर खून महिलेला पळवल्याचा राग चुलत भावाने केले कांड