परळी - गावागावात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वतःच्या गावात आतापर्यंत तुरळक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्य सरकारकडून सांगितलेल्या सर्व नियमावलींची अंमलबजावणी येथील ग्रामस्थ करत आहेत.
गावकऱ्यांचा एकजुटीने कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न!
तालुक्यातील नाथ्रा हे शहरापासून 20 किलोमीट अंतरावर असून गावाची लोकसंख्या अंदाजे 2 ते 3 हजार आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे हे जन्मगाव आहे. मंत्री मुंडे येथील समस्येकडे विशेष लक्ष देत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. गावकऱ्यांनी एकत्र येवून शासकीय नियमांचे पालन करुन एकजूटीने कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तसेच शासनाच्या नियमांचे ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी तंतोतंतपणे पालन केले जाते. गावातील अनेक रहिवाशी नोकरी अथवा रोजगाराच्या निमित्ताने पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे स्थलांतरित झाले आहेत. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थलांतरित झालेले अनेक कुटुंब कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावाकडे आले. यावेळी शासनाच्या नियमानुसार यासर्व कुटूंबाना गावात आल्यावर १४ दिवस कॉरन्टाईन व्हावे लागले. ज्यांची व्यवस्था आहे त्यांना घरी सोडण्यात आले व ज्यांची व्यवस्था नाही अशा रहिवाशांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कॉरन्टाईन करण्यात आले. यांची सर्व व्यवस्था त्यावेळी ग्रामपंचायतकडून करण्यात आली. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन गावकरी स्वतः करु लागले. असे असताना सर्वच ठिकाणी प्रादुर्भाव वाढल्याने या गावातही कोरोनाने प्रवेश केला. कोरोनाचा प्रवेश होताच सर्व गाव ग्रामपंचायतच्या वतीने फवारणी करुन वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. यामुळे कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव वाढला नाही. नंतर पहिल्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला. मात्र पुन्हा फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. यामुळे शासनाने लॉकडाऊन केले. लॉकडाऊनच्या नियमांचे ग्रामपंचायतीच्या वतीने जास्तीत जास्त अंमलबजावणी कशी करता येईल, यासाठी प्रयत्न केला गेला.
ग्रामपंचायतच्या वतीने विविध उपाययोजना
पहिल्या लाटेपासून आजपर्यंत गावात 56 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जवळपास 38 च्यावर कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य विभागाने गावात लसीकरण कॅम्प घेतला. 600 च्या वर रहिवाशांचे लसीकरण करण्यात आले. तर गावातील कोरोनाबाधित रूग्णांच्या मदतीसाठी सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे. यामुळे रुग्णालयापासून ते रेमडेसिवीर उपलब्ध करणे व आरोग्य विषयक सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. ग्रामपंचायतच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात झाली. गावातच प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने गावातच अँटीजेन तपासणी कॅम्प घेण्यात आला. गावातील जास्तीत जास्त नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावे, यासाठी जनजागृती केली. यात मोलाचे योगदान जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, डॉ. संतोष मुंडे, तसेच ग्रामसेवक, कर्मचारी, नर्स, आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविका यांच्यासह गावच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यांनी प्रयत्न केले.
गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक माणसाने, गावाने, शहराने आपापल्या परीने संसर्ग प्रतिबंध करून जनजागृती करण्याची जबाबदारी पार पाडणे आता आवश्यक झाले आहे. त्यातच विविध सामाजिक उपक्रम राबवून ग्राम पंचायतने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही ग्राम पंचायतने अनेक उपक्रम राबवून जनजागृती केली. गावातील प्रत्येक नागरिकाला निरोगी ठेवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केले आहेत. आताही गावात कुणीही आजारी पडू नये, आजारी असेल तर त्याच्यावर उपचार करता यावेत म्हणून काळजी घेत आहेत. गावात प्रभावीपणे स्वच्छता मोहीम राबविली जात असुन सर्व गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी संपुर्ण गावाच्या सहकार्याने प्रयत्न असल्याचे सरपंच कमलाबाई मुंडे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असुन गल्लोगल्ली कोरोनाची लक्षणे, घ्यावयाची काळजी आदींबाबत मार्गदर्शन करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे म्हणाले की, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात कोरोना विषयक सर्व जनजागृती करण्यात येत आहे. तसेच शासनाच्या नियमांचे पालन गावकरी करत आहेत. यासाठी विशेषतः गावकऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले. कोरोना रोखण्यासाठी ग्रामपंचायत रात्रंदिवस मेहनत घेत आहे. ज्यावेळी गावात पेशंट निघाला त्यावेळेपासून गावात नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. पालकमंत्री धनंजय मुंडे देखील गावकऱ्यांच्या मदतीला धावून येतात. तसेच नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
अशी आहे नाथ्रा गावातील सद्यस्थिती
नाथ्रा गावात आतापर्यंत 56 रूग्ण आहेत. सक्रिय 17 आहेत तर एक मृत्यू व 38 जणांनी कोरोनावर मात केली आहे
हेही वाचा - गरीब मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी फेर याचिका न्यायालयात दाखल करू - मंत्री विजय वडेट्टीवार