बीड Maratha Protest : बीडमध्ये मराठा आंदोलनामुळं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांचं राहतं घर पेटवलं. याशिवाय आंदोलकांनी माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांचं ऑफिसही पेटवलं आहे.
संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवलं : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलनानं सोमवारी राज्यात पेट घेतला. मराठवाड्याच्या अनेक भागात आंदोलकांनी जाळपोळ केली. त्यानंतर आता आंदोलकांच्या निशाण्यावर राजकीय नेते आले आहेत. आज सकाळी आंदोलकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचं घर पेटवलं होतं. आंदोलकांनी त्यांच्या घरावर तुफान दगडफेकही केली. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आणखी एक आमदार संदीप क्षीरसागर यांच्या राहत्या घरावर आंदोलकांनी हल्लाबोल केला. त्यांनी संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवलं. तसेच माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या ऑफीसलाही आग लावली.
राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय पेटवलं : मराठा आंदोलकांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय पेटवून दिल्याची घटनाही समोर आली आहे. याशिवाय आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित संस्थांच्या कार्यालयातही जाळपोळ केली. या सर्व घटनांमुळे बीडमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. या आधी मराठा आंदोलकांनी क्षीरसागर कुटुंबीयांच्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयालाही आग लावली होती.
जरांगे पाटलांचं आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन : मराठवाड्यात होत असलेल्या जाळपोळीच्या घटनेंनंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. आंदोलन करणारे लोकं मराठा असू शकत नाही, असं ते म्हणाले. 'कुणाकडून तरी आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय. सर्वांनी शांत राहून आंदोलन करावं. नाहीतर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल', असं जरांगे पाटील म्हणाले.
हेही वाचा :