किल्लेधारूर - बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती, महादेव बाबन बडे यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले.महादेव बडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना पहाटे 2 वाजता निधन झाले.
धारूर तालुक्यातील कासारी बोडखा येथील रहिवासी व भाजपाचे प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.
भोगलवाडी गणाचे जिल्हा परिषद सदस्य
मागील पंचवार्षिक निवडणूकीत ते भोगलवाडी गणाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रचंड मतांनी विजयी झाले होते. यानंतर मात्र पराभूत झाल्यानंतर त्यांच्या निष्ठेचे फळ म्हणून धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी त्यांची निवड करण्यात आली होती. अतिशय संयमी,हसतमुख म्हणून धारुर व वडवणी तालुक्यातील कार्यकर्ता म्हणूनही ते परिचित होते.
ऊसतोड कामगार मुकदम ते जिल्हा परिषद सदस्य, सभापती असा राजकीय प्रवास
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत त्यांनी कासारी बोडखा ग्रामपंचायत वर निर्विवाद वर्चस्व मिळवले. कासारी बोडखा येथे त्यांच्या पत्नी सुनंदा सरपंच तर मुलगा सदाशिव उपसरपंच आहेत. बडे यांनी ऊसतोड कामगार मुकादम ते जिल्हा परिषद सदस्य, सभापती असा विलक्षण यशस्वी राजकीय प्रवास केला आहे.
काही दिवसांपुर्वी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांच्यावर औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे 2 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे तालुक्यातील भाजपाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता गमावल्याची प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा- LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..