नाशिक- कोरानामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे, शहरातील बँका बंद होत्या. यामुळे बँकेतील सर्व व्यवहार ठप्प पडले होते. पेन्शन धारकांची पेन्शन देखील अडकून पडली होती. मात्र, काल शहरातील बँका सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळला आहे. या वेळी बँकेत नागरिकांच्या लांब रांगा पहायला मिळाल्या. मात्र, गोंधळ न घालता नागरिकांनी समझदारी दाखवत सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळल्याचे दिसून आले.
मनमाड शहर हे कामगार वस्तीचे गाव म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी रेल्वे, एफसीआय, पेट्रोलियम कंपनी तसेच विविध सरकारी कार्यालयात काम करणारे नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे, येथे नोकरी करणाऱ्यांसह पेन्शन धारकांची देखील मोठी संख्या आहे. त्यामुळे, महिन्याच्या शेवटी आर्थिक व्यवहारासाठी शहरातील बँकांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी जमते. मात्र, लागून आलेल्या सुट्ट्या व त्यानंतर मार्च महिन्यातील वार्षिक हिशोब यासाठी ३१ मार्च व १ एप्रिल या तारखांना शहरातील बँका बंद होत्या. त्यानंतर, २ तारखेला रामनवमी निमित्ताने बँकांना सुट्टी होती. त्यामुळे, नोकरी करणारे आणि पेन्शन धारकांना मोठी गैरसोय झाली. मात्र, काल बँका उघडल्याने नागरिकांना दिलासा तर मिळालाच. परंतु, बँकांबाहेर लांब रांगा दिसून आल्या.
हेही वाचा- कोरोनासंदर्भात टिक टॉकवर पसरवली अफवा, चौघांना अटक