बीड- शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरीक शासनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. अनेकांच्या तोंडाला मास्क लावलेला नसतो. याचबरोबर सामाजिक कार्यक्रमात लोक एकत्र येत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम होऊन जिल्ह्यात नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दुप्पट वाढून, परिस्थिती बिकट होण्याची शक्यता असल्याची भीती औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केली आहे. आज केंद्रेकर यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात आढावा बैठक घेऊन सूचना दिल्या. बीड जिल्ह्यात कोरोना पोझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याने सुनील केंद्रेकर यांनी आढावा बैठक घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत 130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाच हजारांच्या जवळपास असून आतापर्यंत 3500 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मराठवाड्यात बीड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्येने शतक ओलांडले आहे. यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी योग्य त्या उपाय योजना कराव्यात, अशा सूचना केंद्रेकर यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा-ऊसतोड मजुरांना योग्य दर दिला नाही तर कारखाने सुरू होऊ देणार नाही - सुरेश धस
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्वतः हून काळजी घेतली तर कोरोनाला आटोक्यात आणणे शक्य आहे. अन्यथा परिस्थिती बिकट असेल. नागरिकांनी कोरोनाची लक्षणे जाणवताच तात्काळ तपासणी करून घेऊन योग्य तो सल्ला संबंधित डॉक्टरांकडून घ्यावा. अनेक लोक आपल्याला काहीच होणार नाही या भ्रमात डॉक्टरांकडे जात नाहीत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, असे केंद्रेकर म्हणाले.
1000 ऑक्सिजन बेड तयार करण्याच्या सूचना-
भविष्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता बीड जिल्ह्यामध्ये 1000 ऑक्सिजन बेड तयार ठेवण्यासंदर्भात सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना सूचना दिल्या आहेत. बैठकीनंतर त्यांनी बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची उपस्थिती होती.