बीड - जिल्ह्यातील केज तालुक्यात एका जीप चालकाचा परराज्यातील आरोपींनी खून केल्याची घटना सोळा वर्षांपूर्वी घडली होती. याचा तपास घटना घडल्यानंतर काही वर्ष चालला व नंतर थांबला होता. परंतु, 'कानून के हाथ लंबे होते है'! याचा प्रत्यय आला. चुकीला माफी नाही, म्हणत, केज पोलिसांनी सोळा वर्षांपूर्वी खून केलेला परराज्यातील आरोपींना जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी, ३१ डिसेंबर २००३ केज तालुक्यातील नांदूरघाट परिसरात बंदेवाडी शिवारातील एका विहिरीत एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. ही घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पोलिसांनी मृतदेह विहिरीतून काढून त्याची उत्तरीय तपासणी केली असता प्रेताच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. मग पोलिसांच्या लक्षात आले की, हा घातपात आहे.
हेही वाचा - बी़डमध्ये मोबाईल चोरीला गेल्याच्या तणावातून तरुणाची आत्महत्या
पोलिसांनी आपल्या खबऱ्यांमार्फत मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यावेळी बीड तालुक्यातील चऱ्हाटा गावातील एक जीप चालक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. अशातच एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच जीप चालकाचे पोलीस सेवेतील काकांनी मृतदेह ओळखला. त्याचे नाव किशोर उबाळे, असे होते. त्यानंतर केज पोलीस ठाण्यात २००३ साली भा. दं. वि. ३०२, ३६४, ३९४ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल झाला होता.
हेही वाचा - परळी पोलिसांनी पकडला ३५ लाखांचा गुटखा; खरे सूत्रधार मोकाटच
किशोर उबाळे यांचे मारेकरी कोण? त्याचा खून कोणी केला ? का केला? कशासाठी केला? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे होते. तपासात एक पुरावा होता तो म्हणजे किशोरचा खून केल्यानंतर किशोर चालवत असलेली जीप गायब झाली होती. हाच धागा पकडून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली. किशोरच्या मारेकऱ्यांनी पळवून नेलेल्या जीपचा जळगावजवळ अपघात झाला होता. त्या अपघातात दोन मारेकरी गंभीर जखमी झाल्याची आणि जखमींनी जळगावच्या सरकारी दवाखान्यात उपचार घेऊन तिथून पळून गेल्याच्या माहिती केज पोलिसांना मिळाली. ज्या अर्थी जीप अपघातातील जखमी उपचार घेत असताना पळून गेले त्या अर्थी तेच किशोरचे मारेकरी असल्याचे निष्पन्न झाले. मग पुढे खटला दाखल झाला.
हेही वाचा - तीन महिन्यांपासून 'हे' गाव अंधारातच; ग्रामस्थांची हेळसांड
राजस्थान राज्यातून महाराष्ट्रात अनेकजण शाल, रग, स्वेटर्स, चादरी असे उबदार आणि लोकरीचे कपडे विक्रीचा व्यावसाय करण्यासाठी येत असतात. हा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यापैकीच राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील श्रीरामकुल मिना (रा. सितारामपूर, ता. जि. टोंक) आणि तुफान कल्याणी मिना (रा. दौलतपुरा, ता. जि. टोंक) हे दोघे राजस्थानातून महाराष्ट्रात उबदार कपडे विकण्यासाठी आले होते. ग्रामीण भागात फिरून खेड्या पाड्यात ते कपडे विकण्यासाठी त्यांना माल घेऊन जाण्यासाठी त्यांना जीप हवी होती. त्यासाठी त्यांनी शोधाशोध करून बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथील किशोर भरत उबाळे या युवकाची कमांडर जीप ( एम एच २२ ९६८७) भाड्याने ठरविली. या गाडीत माल टाकून मग हे दोघे बीड येथून नांदूर आणि जवळच्या परिसरात माल विक्रीसाठी सकाळीच निघाले.
मात्र, गाडीत बसल्या पासून श्रीरामकुल मिना आणि तुफान कल्याणी मिना यांच्या मनात वेगळाच विचार घोळत होता. परंतु किशोर बेसावध होता. त्याच्या मनात खूप मोठे आणि किमान पंधरा वीस दिवस आता आपल्याला हे भाडे मिळाले या आनंदात तो गाडी चालवीत होता. गाडी बीड, पाली, मांजरसुंबा, नेकनूर येळंब पास करून नांदूर फाट्यावर आली. तिथून पुढे नांदूर फाट्यावरून नांदूर घाटकडे जात असताना रस्त्यात निर्मनुष्य ठिकाणी त्यांना एक छोटा तलाव दिसला आणि दोघांनी एकमेकांना इशारा केला की किशोरचा खून करण्यासाठी हीच जागा योग्य आहे.
त्यांनी किशोर यास आम्ही येथे तलावात अंघोळी करतो, असे सांगून आणि गाडी थांबवण्यास सांगितले. किशोरने गाडी थांबताच तो बेसावध असल्याचे पाहून त्या दोघांनी जवळचे धारदार शस्त्राने किशोरवर हल्ला केला. त्या दोघांच्या ताकदी पुढे किशोर निष्प्रभ ठरला आणि त्यांनी किशोरवर सपासप वार केले. किशोर मृत झाल्याची खात्री होताच त्या दोघांपुढे आता या प्रेताची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न पडला. मग त्यांनी दोघांनी किशोरचे प्रेत गाडीत टाकून रस्त्याच्या कडेला एक विहीर पाहून त्यात प्रेत टाकले आणि किशोरची कमांडर जीप घेऊन पळ काढला. पोलीस आपल्याला पकडतील, या भीतीने त्यांनी जळगावमार्गे राजस्थानच्या दिशेने निघाले. मात्र, जळगाव जवळ गाडीचा अपघात झाला आणि त्या अपघातात श्रीरामफुल मिना आणि तुफान कल्याणी मिना हे दोघे जखमी झाले. अपघात पहाणाऱ्या लोकांनी त्यांना जळगावच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. मात्र, त्यांना किरकोळ मार लागल्याने आणि पोलीस पकडतील या भीतीने ते दवाखान्यातून राजस्थानात पळून गेले.
किशोर उबाळे याच्या घरच्यांनी किशोर घरी न आल्याने त्याचा शोध घेतला असता त्याचे प्रेत केज पोलिसांना सापडल्याने त्याचे पोलीस काका बी. गी. उबाळे यांनी त्याला ओळखल्याने पोलीस स्टेशन केज येथे दिनांक ३१, डिसेंबर २००३ रोजी गुन्हा दाखल झाला. त्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता.
आता या घटनेला तब्बल सोळा वर्षांचा कालावधी उलटला होता. या खून प्रकरणातील आरोपी मिळून येत नव्हते. अनेक वेळा पोलीस पथक राजस्थानला जाऊन आले. परंतु, आरोपी सापडत नव्हते. काही दिवसानंतर पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली की, या खून प्रकरणातील एक आरोपी तुफान कल्याणी मिना (रा. दौलतपुरा,ता.जि. टोंक) याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना समजले. परंतु, दुसरा आरोपी रामनिवास श्रीरामफुल मिना (रा. सितारामपूर ता.जि. टोंक) याचा काहीच पत्ता लागत नसल्याने तपासाधिकाऱ्याने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने आरोपी रामनिवासचा अटक वारंट केज पोलिसांना देऊन आरोपीस हजर करण्याचे आदेश दिले.
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस उपअधीक्षक अशोक आम्ले, केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक चोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अनिस शेख, पोलीस हवालदार प्रेमचंद वंजारे व पोलीस शिपाई महादेव बहिरवाळ या पथकाने ३ सप्टेंबर, २०१९ रोजी आरोपी रामनिवास याच्या शोधार्थ राजस्थान येथे रवाना झाले होते.
त्यानंतर पथकाने आरोपीच्या गावी सितारामपूर येथे चार-पाच दिवस कोणालाही संशय न येता आरोपीची माहिती गुप्त रित्या घेतली असता यातील आरोपी याने त्याचे नाव रामनिवास हे बदलून अशोक कुमार, असे केले होते. हे नाव आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रांवर लावून त्या नावाने तो त्याच्या गावापासून १५० किमी अंतरावर असलेल्या कोटा येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. याआधारे पथकाने मोठ्या शिताफीने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला त्याच्या मूळ गावी आणून त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा केले. त्यास ताब्यात घेऊन केज पोलीस ठाण्यात आणून अटक केली. त्यास अंबाजोगाईच्या सत्रन्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी अशोककुमार उर्फ रामनिवास श्रीरामफुल मिना यास न्यायालयीन कोठडी सुनावली. केज पोलीस पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.