बीड - शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शुक्रवारी जाहीर कार्यक्रमातून बीडकरांना होणाऱ्या या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
हेही वाचा- आशा सेविकांचा वेतनवाढीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार!
शहरातील श्री छत्रपती संभाजी महाराज मैदानावर शुक्रवारी नगरपालिकेच्यावतीने जिवाजी महाले व लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याचे अनावरण विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्षीरसागर म्हणाले, की अनंत काळासाठी बीड शहर स्वच्छ व सुंदर पहायचे असेल तर आता किंचितसा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. शिवसेनेच्या काळात बीड नगरपालिकेला चारशे ते साडेचारशे कोटी रुपयांचा विकास कामांसाठी निधी प्राप्त झालेला आहे. बीड शहराच्या विकासाबरोबर ग्रामीण भागाच्या विकासाला देखील आपण प्राधान्य देत आहोत. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेताकडे जाणार चांगला रस्ता देण्याचे काम आम्ही केले आहे.
हेही वाचा - आढावा विधानसभेचा : अस्तित्वासाठी क्षीरसागर काका-पुतणे सज्ज, मेटे मांडणार वेगळी चूल?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून मागच्या २ वर्षात साडेचारशे ते पाचशे कोटीहून अधिक निधी बीड शहराच्या विकासासाठी आणला आहे. भुयारी गटार योजना व पाणीपुरवठा योजना या दोन्ही योजनांचे काम एकाच वेळी सुरू झालेले आहे. याचा परिणाम शहरात ठिकाणी रस्ते खोदावे लागले आहेत. मी अगदी नम्रपणाने व प्रामाणिकपणे बीडकरांना एक विनंती करतो, की सध्या बीड शहरातील रस्ते खोदलेले असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, चांगले रस्ते व अंडरग्राउंड गटारे करायच्या असतील तर रस्ते खोदावे लागणार, यामुळे आपल्याला होत असलेला त्रास थोड्या दिवसांसाठीचा आहे. पुढील पन्नास वर्ष आपल्याला चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, यासह मुलभूत सुविधा मिळणार आहेत. खराब रस्त्यामुळे होत असलेला त्रास अजून थोडे दिवस होईल. ही परिस्थिती आपण समजून घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा - विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह महातेकरांना दिलासा
कार्यक्रमात हरिभाऊ बागडे व क्षीरसागर यांच्या हस्ते उपस्थित असलेल्या गोरगरीब नागरिकांना घरकुल निधी मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. 2 हजार 254 नागरिकांना मंजुरी पत्र दिले. याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरी पत्र विमापत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून क्षीरसागर यांनी तयारी सुरू केली असल्याचा प्रत्यय आला.