बीड - जिल्ह्यातील परळी शहरातील बरकतनगर परिसरात रेल्वे रूळाशेजारी कुपाटीमध्ये एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले आहे. परिसरातील नागरिकांनी अर्भक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बरकतनगर परिसरात रेल्वे रुळाशेजारी बाळ रडण्याचा आवाज परिसरातील नागरिकांना आला. त्यांनी पाहिले असता, एका फडक्यात गुंडाळेलेले अर्भक आढळले. या स्त्री जातीच्या अर्भकाला परळी नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अर्भकाचा जन्म काही तासांपूर्वीच झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
फेकल्यामुळे अर्भकाच्या अंगात काटे टोचले आहेत. त्यामुळे अर्भकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने परळी शहरात एकच खळबळ उडाली असून रात्री उशीरापर्यंत पोलिसांत या घटनेची नोंद झाली नव्हती.