बीड (अंबेजोगाई) - कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे. याची घोषणा झाल्यावर वारसांना अर्ज करण्यास सांगण्यात आलं. यामध्ये चक्क जिवंत व्यक्तींची नावं असल्याचा धक्कादायक प्रकार अंबेजोगाई येथे समोर आला आहे. एक दोन नाही तर, चक्क 216 जिवंत माणसांचा समावेश हा कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या यादीत करण्यात आल्याची प्राथमिक माहिती ( Covid Dead List Mess Beed ) समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा गलथानपणा समोर आला आहे.
अधिकृत मृतांपेक्षा यादीत जास्त नाव..
कोरोनामुळे मृत झालेल्या ( Death Due To Covid ) व्यक्तींच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान म्हणून, 50 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मृत व्यक्तींची माहिती घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करायचे काम शासन स्तरावर सुरू आहे. अंबेजोगाईच्या आरोग्य विभागाकडे ( Ambejogai Health Department ) असलेल्या यादीमध्ये एकूण मृत 316 जणांची नावाची नोंद आहे. मात्र तहसीलदारांना उपलब्ध असलेल्या यादीमध्ये मात्र 532 नावे आहेत. त्यामुळे वाढीव 216 नावे आली कुठून असा प्रश्न आता समोर आला आहे.
असा उघड झाला प्रकार..
सरकारी पोर्टलवर असलेल्या मृत व्यक्तींच्या संख्येपेक्षा जास्त नावं महसूल विभागाकडे आल्याने, कर्मचाऱ्यांनी या नावाची खातरजमा करण्यासाठी या मृत व्यक्तींच्या घरी चौकशी सुरू केली. त्यात यादीत कोरोना मृत दाखवलेले नागनाथ वारद यांच्याकडे कर्मचाऱ्याने जाऊन तुमच्या घरातील व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, त्यांची माहिती द्या असे सांगितले, चक्क माहिती देणारे स्वतः नागनाथ वारद होते. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे आता सर्वच नावांची खातरजमा करण्याची वेळ राज्यात सरकारवर आली आहे.