बीड - एका व्यक्तीला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने चिरडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला आहे. गेवराई तालुक्यामधील गंगावाडी येथे ही घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील एकही वाळू पट्ट्याचा लिलाव नसताना चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक सुरू आहे. याकडे बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक आर.राजा यांचे दुर्लक्ष होत आहे. या अपघातानंतर ग्रामस्थ संतप्त झाले असून जोपर्यंत वाळू वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.
प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
रुस्तुम बाबाजी मते असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गंगावाडी लगतच्या राक्षसभुवन नदीपात्रात पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे राक्षसभुवन येथील नदी पट्ट्याचा लिलाव झालेला नाही, असे असतानाही चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक केली जात आहे. याबाबत अनेक वेळा बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक आर राजा यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. परिणामी सोमवारी रुस्तुम यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणानंतर गावकरी संतप्त झाले आहेत.
मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ग्रामस्थांचा नकार
अवैध वाळू वाहतुकीमुळे बीड जिल्ह्यातील शेकडो गावांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक गावांच्या जिल्हा प्रशासनाकडे अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात तक्रारी आहेत. मात्र त्याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत आहे. जोपर्यंत जिल्हा प्रशासन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करत नाही आणि जिल्हा अधिकारी घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा गंगावाडी येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. जर प्रशासन कारवाई करणारच नसेल तर जिल्हा प्रशासनाला अजून किती बळी घ्यायचे आहेत असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - 1993 साखळी बॉम्ब स्फोटातील महिला आरोपीला 6 दिवसांचा पॅरोल; 'हे' आहे कारण