बीड - जिल्ह्यतील एकमेव पशुधन राहत शिबीर येथे हायड्रोफोनिक चारा तयार करण्याचा अभिनव प्रयोग राबवला जात आहे. या हायड्रोफोनिक चाऱ्याच्या माध्यमातून दरदिवशी १ हजार किलो (मकाचा) हिरवा चारा तयार करून दुभत्या जनावरांना दिला जात आहे. गो-शाळा चालक राजेंद्र मस्के यांनी हा उपक्रम राबवला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे दुष्काळात दुभत्या जनावरांना हिरव्या चाऱ्याचा आधार मिळत आहे.
बीड जिल्ह्यातील पालवण येथे तुकाराम गुरुजी गोदाम प्रकल्पांतर्गत पशुधन राहत चारा शिबिर आहे. येथे ४ हजार २०० गाईंची व्यवस्था केंद्र शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकमेव पशुधन राहत चारा शिबिर येथे दुभत्या गायींची भर दुष्काळात विशेष काळजी घेतली जात आहे. यामध्ये हायड्रोफोनिकपद्धतीने मका चारा तयार केला जातो. दर दिवशी १ हजार किलो ओला चारा तयार करून रखरखत्या दुष्काळात गाईंना एक वेळ हिरवा चारा देण्याची व्यवस्था केली जात असल्याची माहिती गो-धाम चालक राजेंद्र मस्के यांनी दिली.
हायड्रोफोनिक चाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे १ किलो मक्यात १२ किलो चारा तयार होतो. प्रति दिवसाला १ हजार किलो चारा तयार करण्याची यंत्रणा या शिबिरात केली आहे. छावणी चालकांना अथवा पशू मालकांसाठी राजेंद्र मस्के यांचा हा प्रयोग प्रेरणादायी ठरत आहे. विशेष म्हणजे केवळ तुषार सिंचनच्या साह्याने हा चारा तयार होतो. या चाऱ्याला अत्यल्प पाणी लागत असल्याने चाऱ्याची निर्मिती करणे सोपे आहे.