बीड - ऑक्सिजन प्रकल्पाची सुरक्षा करताना कोरोनाची लागण झाल्याने एका होमगार्डला आपला प्राण गमवावा लागला आहे. मंगळवारी (25 मे) ही दुर्दैवी घटना घडली.
ऑक्सिजन प्लांटची करायचे सुरक्षा
नागेश्वर कुंभारकर (४६, रा. चऱ्हाटा ता.बीड) असे मृत्यू झालेल्या त्या होमगार्डचे नाव आहे. ते बीड ग्रामीण ठाण्यात नेमणुकीला होते. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ऑक्सिजन प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नामलगाव फाटा (ता. बीड) येथील विकास ऑक्सिन प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी त्यांची ड्युटी लावण्यात आली होती. या दरम्यान, ज्या प्राणवायूने अनेकांना जीवदान मिळाले. तेथेच कर्तव्य बजावताना होमगार्ड नागेश्वर कुंभारकर यांना कोरोनाची बाधा झाली होती.
कोरोनाने खासगी रुग्णालयात मृत्यू
चार दिवसांपूर्वी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर ते जामखेड (जि. अहमदनगर) येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
हेही वाचा - 12 वीची सीबीएसई परीक्षा रद्द करा- 300 विद्यार्थ्यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र