बीड- जिल्ह्यामध्ये ४९ छावण्या सुरू आहेत. आष्टी, वडवणी, गेवराई व बीड या चार तालुक्यांमध्ये ४९ छावण्यांमधून तब्बल २९ हजार जनावरे आश्रयाला आहेत. मात्र, दोन महिने उलटले तरी देखील जिल्ह्यात वरुणराजा बरसला नाही. परिणामी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा दुभती जनावरे कवडीमोल भावाने विकत असल्याचे चित्र आहे.
मागील तीन वर्षापासून बीड जिल्ह्यात दुष्काळी चित्र आहे. उन्हाळ्यामध्ये छावण्यांची संख्या ६०३ वर गेली होती. तर बाराशेहून अधिक पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू होते. आज घडीला बीड जिल्ह्यात सरासरीच्या २५ टक्के एवढाच पाऊस झालेला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला थोडाबहूत पाऊस झाला होता. या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र जून महिन्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यात एकूण ८ लाख २२ हजार जनावरे आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे थोडा बहूत चारा आहे. त्यांनी आपली जनावरे छावणीतून घरी नेली आहेत. मात्र ज्यांना चाऱ्याची टंचाई भासत आहे त्यांनी आपली जनावरे छावणीमध्ये ठेवली आहे. जिल्ह्यातील वडवणी, बीड, आष्टी, गेवराई या तालुक्यांमध्ये ही परिस्थिती पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात मागील दोन दिवसात तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आहे. या पावसामुळे न शेतकऱ्यांची पिके वाढू शकत न जनावरांचा चारा उपलब्ध होऊ शकत असे चित्र आहे. अशा परिस्थितीत दुभती जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.