आष्टी (बीड) - पोलीस कर्मचारी हाय..हाय..मुजोर पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशा घोषणा घेत तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आष्टी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन आष्टी तहसीलदार राजाभाऊ कदम यांना दिले. जो पर्यंत त्या मुजोर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होत नाही, तो पर्यंत काम बंद अंदोलन करणार असल्याचा इशार निवेदनाव्दारे देण्यात आला.
हेही वाचा - धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून परळीकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा 'सेवाधर्म सारे काही समष्टीसाठी' उपक्रम
निवेदनात म्हटले आहे की, 5 मे रोजी सांयकाळी आष्टी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विशाल वनवे हे आपले कर्तव्य बजावून आपल्या गावाकडे सांयकाळी निघाले होते. त्यांना चऱ्हाटा येथे पोलिसांनी अडविले व कुठून आला, कुठे चालला असे अर्वाच्य भाषेत विचारले. डाॅक्टरने आपल्याकडील असलेले ओळखपत्र दाखविले व मी आत्ताच ड्युटी करून आलो आहे, आता घरी चाललो आहे, असे सांगत असतानाच एका पोलीस कर्मचाऱ्याने कसलाच विचार न करता डॉक्टरच्या पाठीमागून काठी मारली व तीन चार पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना मारले. याबाबत डाॅ. विशाल वनवे यांनी तक्रार केली असून, आष्टी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी या मारहाणीचा निषेध केला असून, जो पर्यंत संबंधित पोलिसांवर कारवाई होत नाही, तो पर्यंत आपण कामबंद अंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर डाॅ. प्रसाद वाघ, डाॅ. दत्ता जोगदंड, डाॅ. दिपक शेळके, डाॅ. सचिन पाळवदे, डाॅ. नितीन राऊत, डाॅ. नारायण वायभसे या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, जो पर्यंत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होत नाही, तो पर्यंत तालुक्यात कोठेच लसीकरणही होणार नसल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गेल्या वर्षभरापासून आम्ही तालुक्यात आरोग्य सेवा देत आहोत. यामध्ये आमचे कित्येक कर्मचारी पाॅझिटिव्ह आले असून त्यांना सुद्धा उपचारासाठी बेड मिळत नाही. आणि या मुजोर पोलीस कर्मचाऱ्यांनी कसलाच विचार न करता एखाद्या कुख्यात गुंडासारखे डाॅक्टरांना मारहाण केली आहे. त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही तालुक्यात लसीकरण करणार नाहीत, असे आष्टीचे आरोग्य कर्मचारी नागेश करांडे म्हणाले.
डाॅक्टरांना कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांकडून मारहाण झालेला प्रकार अत्यंत निंदनीय असून मी स्वत: डाॅ. वनवेची भेट घेतली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांना मारहाण केलेल्या पोलीस उपाधिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी याबाबत आपण आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
हेही वाचा - परळीत कोविड लस न घेताच महिलेला लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र