बीड- जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये बीड जिल्हा भाजपच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन व कोरोनाचे संकट यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणा व्यस्त आहे. प्रशासनाला मदत म्हणून जिल्हा भाजपच्यावतीने मागील ३५ दिवसात ८५ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली.
तपासणीदरम्यान ज्या नागरिकांना सर्दी, खोकला, ताप होता अशा १८५ जणांचे विलगीकरण देखील करण्याचे काम शिबिरांच्या माध्यमातून करण्यात आल्याचे डॉ. लक्ष्मण जाधव म्हणाले. कोरोना संकटकाळात जिल्ह्यातील अनेक पक्ष, संघटना व संस्था जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी सरसावले आहेत. आपापल्या परीने जिल्हा प्रशासनाला जी मदत करता येईल ती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा भाजपच्या वतीने मागील ३५ दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिरे सुरू आहेत.
आज बीड तालुक्यातील बेलखंडी येथे आरोग्य शिबीर झाले. यामध्ये ५०० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. मागील ३५ दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिरांमध्ये एकूण ८५ हजार रुग्णांची तपासणी केली असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सांगितले. लॉकडाऊन असल्यामुळे वाहनांची व्यवस्था नाही. परिणामी ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना छोट्या-मोठ्या आजारासाठी शहरांमध्ये येऊन आरोग्य तपासणी करणे अवघड झाले आहे. मात्र, जिल्हा भाजपच्या वतीने घेण्यात येत असलेल्या आरोग्य शिबिरामुळे गावातील नागरिकांना त्यांच्याच गावात आरोग्यसेवा उपलब्ध होत आहे. कोरोना सारख्या बिकट परिस्थितीत वेळेवर आरोग्य सेवा देण्याचे काम भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, डॉ. लक्ष्मण जाधव, विक्रांत हजारी, संध्या राजपूत यांनी केले आहे.
हेही वाचा- ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील 'हे' विभाग अनिश्चीत कालासाठी पूर्णत: बंद