बीड : तुफान गारपीटीमुळे आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली आहे. घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या गारपीटीत महसुल प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. या भागात हिमाचल प्रदेशासारखी सगळीकडे गारपीट झालेली पाहायला मिळत होती. आष्टी तालुक्यातील अरणविहीरा येथे अवकाळी जोरदार पावसाने शनिवारी गारपिटीचा तडाखा बसला आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस : या पावसामुळे माणसाच्या गुडघ्या इतका गारांचा थर साचलेला सगळीकडे पाहायला मिळाला. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी तात्काळ पंचनामे करण्याची मागणी करत आहे. मागील दोन दिवसांपासून सकाळी कडक ऊन तर दुपारी आकाशात ढग दाटून येत आहे. नंतर वादळी वाऱ्यासह सायंकाळच्या दरम्यान तालुक्यातील कोणत्यातरी भागात जोरदार पाऊस होत आहे. गारपीट होत आहे.
पिकांचे अतोनात नुकसान : तालुक्यातील मागील आठवड्यात झालेल्या अवकाळीने हवालदिल असलेला शेतकरी अजून संकटात सापडला आहे. शनिवारी पुन्हा अरणविहिरा परिसरात प्रचंड गारपिट झाली. शेतकऱ्यांच्या फळबागा व उन्हाळी पिकांचे त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. पिंपळगाव घाट, देऊळगाव घाट, हरेवाडी, मराठवाडी येथील अनेक शेतकऱ्यांनी कांदा बियाण्यासाठी तयार केलेले गोट तसेच जनावरांसाठी खाद्य म्हणून तयार केलेले मका, कडवळ तसेच काही ठिकाणी डाळिंबाच्या बागांवर या गारपीटीमुळे फार मोठा परिणाम झालेला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान : बीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पाऊस थांबायचे नाव घेत नाही. बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे या गारपीटीमुळे प्रचंड नुकसान होत आहे. अनेक नेते मंडळी पाहणी दौरे करून गेले. कृषी मंत्री आले, त्यानंतर विरोधी पक्ष नेते आले यांनी पाहणी दौरे केले. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कांदा, मोसंबी, अंजीर, चिकू, आंबा या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी निसर्गापुढे हातबल झाला आहे. आता शेतकऱ्यांपुढे काय करावे? हाच प्रश्न राहिला आहे.
हेही वाचा : Heavy Rainfall in Sangli : सांगलीत अवकाळी पावसासह तुफान गारपीट, द्राक्षबागांना फटका