बीड - जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने गुरुवारी हजेरी लावली. यावेळी विजेच्या कडकडाटासह अंबाजोगाई व पाटोदा तालुक्यात पाऊस पडला. यादरम्यान वीज अंगावर पडून दोन जण ठार झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली. अवकाळी पावसामुळे फळबाग असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
तारामती बाळासाहेब चाटे ( रा. तांबवा ता. केज) व धारुर तालुक्यातील येथील संदिपान श्रीकृष्ण काळे (वय २०) यांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले थोड्याच वेळात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. याच दरम्यान अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. वडवणी तालुक्यातील बाबी तांडा येथे एका बैलाच्या अंगावर वीज पडली. जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी, केज, आणि शिरूर कासार या तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय माजलगाव, परळी, आणि गेवराई तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात फळबागांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.