परळी (बीड)- परळी शहरातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार भास्करराव जोशी यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले होते, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भास्करराव जोशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी क्षेत्रोपाध्याय वामनगुरु जोशी आणि मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्यासह जोशी कुटुंबातील सदस्यांचे त्यांनी सांत्वन केले.
जुन्या पिढीतील अत्यंत अभ्यासू पत्रकार म्हणून भास्करराव जोशींची ओळख होती. पुणे येथून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. तद्नंतर परळी येथील साप्ताहिक जगमित्रचे ते संस्थापकीय संपादक होते. अलीकडच्या काळात अनेक पत्रकार-लेखकांना ते मार्गदर्शन करत.
भास्करराव जोशी यांचे कनिष्ठ चिरंजीव प्रशांत हे धनंजय मुंडे यांचे 20 वर्षांहून अधिक काळापासून स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यामुळ जोशी कुटुंबियांशी मुंडे यांचा दीर्घकाळापासून स्नेह आहे.
भास्करराव जोशी हे जुन्या पिढीतील एक ज्येष्ठ पत्रकारच नव्हे ते आमचे मार्गदर्शकही होते. जनसंघाच्या सुरुवातीच्या काळापासून परळीत सक्रिय पत्रकारितेसह त्यांनी समाजकार्यात योगदान दिले. त्यांच्या निधनाने आम्ही एक पितृतुल्य मार्गदर्शकाला मुकलो आहोत, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. यावेळी जोशी कुटुंबीयांसह राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष अजय जोशी, सचिन जोशी, पत्रकार अनंत कुलकर्णी, वैजनाथ जोशी आदी उपस्थित होते.