बीड - बीडच्या धारूर तालुक्यात कासारी येथील एक शेतकरी आपल्या नातवांसोबत बैलांना पाणी पाजण्यासाठी तलावावर घेऊन गेले. त्यावेळी परिसरातील रानडुकराने अचानक बैलांवर हल्ला केला. त्या घटनेत बैल मोठ्या प्रमाणात घाबरल्याने ते धावत सुटले. बैलांची ही बैलगाडी थेट तलावात ओढत नेली. त्यामध्ये दोन नातू व आजोबा बसलेले होते, त्यामध्ये एक नातू बैलावर बसून बाहेर आल्याने तो बचावला तर आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला. तसेच, यामध्ये एका बैलाचाही मृत्यू झाला आहे. ही घटना आज गुरुवार (दि. 22 डिसेंबर)रोजी दुपारी घडली आहे.
कबीर बाशुमिया सय्यद हे आपले नातू अजमत अखिल सय्यद वय 10 वर्ष, व आतिक अखिल सय्यद वय 12 वर्षे या दोन नातवांसोबत शेतकरी रानात गेले होते. कासारी शिवारातील बालाघाट डोंगरात असलेल्या वाघदरा तलावाच्या मार्गाने शेताकडे ते जात होते. तेथील तलावाच्या काठावर असलेल्या काही रानडुकरांनी बैलावर हल्ला केला त्यामध्ये बैल घाबरले आणि ते बैलगाडी ओढत थेट तलावात शिरले त्यानंतर ही घटना घडली आहे. दरम्यान, दिंद्रुड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पाहणी करत या घटनेची नोंद केली आहे.