बीड - धारूर तालुक्यामधील गावंदरा येथील एक 17 वर्षीय मुलीचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी कपडे धुण्यासाठी तलावावर गेली असता, पाय घसरून तलावात पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली. प्रीती दत्तात्रय घुले, असे मृत मुलीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की धारुर तालुक्यातील गावंदरा या गावाजवळच एक छोटा तलाव आहे. गुरुवारी सकाळी गावालगतच्या तलावावर प्रीती घुले ही कपडे धुण्यासाठी गेली होती. याच दरम्यान तिचा अचानक पाय घसरला आणि ती पाण्यात बुडाली. या घटनेची येथील ग्रामस्थांना माहिती मिळताच ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेऊन प्रीतीला तलावाच्या बाहेर काढले आणि तत्काळ धारूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्रीतीला मृत घोषित केले.
या घटनेमुळे गावंदरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रिती ही बारावीमध्ये शिकत होती. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.