बीड- राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाकाळात घर, परिसरात आणि शहरात स्वच्छता ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र बीडमध्ये याच्या उलट परिस्थिती आहे. मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. बीड नगरपालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी केला आहे.
सध्या बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन वेळोवेळी करत आहे. मात्र बीड शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे तसेच पडून आहेत. याशिवाय बिंदुसरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. एकंदरीत या सगळ्या घाणीमुळे बीडकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा व्यवस्थापन करण्यामध्ये बीड नगरपालिका अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे.
'ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे'
बीड शहरातील कचरा उचलण्याचा ठेका ज्या कंपनीला दिला आहे. त्या कंपनीच्या ठेकेदाराचा कामचुकारपणा बीडकरांच्या जीवावर उठला आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. असे असताना व नागरिक दुर्गंधीबाबत तक्रार करत असताना देखील पालिका प्रशासन ठेकेदाराकडून बीड शहराची साफसफाई करून घेत नाही. दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. याची जबाबदारी बीड पालिका प्रशासन आणि ठेकेदारावर असून, पालिके ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी देखील यावेळी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
'कोरोना काळात तरी शहर स्वच्छ ठेवावे'
बीड शहरातील विविध भागातील मुख्य रस्त्यांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. यामध्ये शहरातील सह्योग नगर, भाजी मंडई परिसर, स्वराज्य नगर, भक्ती कन्स्ट्रक्शन, पिंपरगव्हाण रोड या परिसरात रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग साचले आहेत. कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण होत आहे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे बीड नगरपालिकेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निदान कोरोना काळात तरी शहर स्वच्छ ठेवावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे राहुल वायकर यांनी केली आहे.