बीड: माहितीनुसार, बिंदुसरा तलावाजवळ दोन दिवसांपूर्वी एक अनोळखी मृतदेह आढळला. एका चहाच्या टपरी चालकाने ही घटना ग्रामीण पोलीस ठाण्याला फोनद्वारे कळविली. यानंतर बीड ग्रामीण पोलिसांचा ताफा तेथे तात्काळ पोहोचला. मात्र या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. मृतदेहाच्या हातावर अक्षय नाव लिहिल्याने पोलिसांसमोर त्या मृतदेहाची ओळख पटवणे आणि खून का झाला? हे शोधणे आव्हानात्मक होते. मात्र अवघ्या 12 तासांत बीड ग्रामीण पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली आहे. हा मृतदेह बीड शहरातील अक्षय राजेंद्र मडकर या व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले; मात्र हा खून कोणी आणि का केला याचे आव्हान देखील पोलिसांसमोर होते.
पोलीस तक्रारीनंतर खून: तपासादरम्यान पोलिसांना कळले की, काही दिवसांपूर्वी अक्षय मडकर याने मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीत दोन व्यक्तींचे नाव होते. याच आधारावर पोलिसांनी पुढे शोध घेतला. यामध्ये रोहन जाधव प्रकाश आणि वैभव क्षीरसागर या दोन व्यक्तींनीच अक्षयचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे स्पष्ट झाले. हे दोघेही फरार असल्याने त्या दोघांचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे एक पथक नियुक्त करण्यात आले. अखेर पोलिसांच्या पथकाने अथक प्रयत्नांतून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर हत्येत झाल्याचे समोर आले. पोलीस दुसऱ्या आरोपीचाही शोध घेत आहे.
डोक्यात दगड घालून खून: बीड जिल्ह्यात यापूर्वीही निर्घृण हत्याकांड घडले होते. बीड मधील आष्टी तालुक्यात झोपेत असलेल्या एका गंवड्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला होता. ही घटना 26 नोव्हेंबर, 2020 रोजी उघडकीस आली होती. त्याच्या सहकारी मजुरानेच हा खून केला होता. त्याला पोलिसांनी अटक केली होती. झोपेत असलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील देवीनिमगाव येथे गुरुवारी घडली होती.
हेही वाचा: Drone Shot Down: जम्मू काश्मिरात शस्रास्रांसह पाकिस्तानी ड्रोन जप्त