परळी- गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने परळीत कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन सेंटर सुरू करणयात आले आहे. या सेंटरमध्ये भरती झालेल्या कोरोनाबाधित रूग्णांमध्ये दिवसेंदिवस सकारात्मक उर्जा निर्माण होत असून हे रुग्ण कोरोनावर मात करू लागले आहेत. या सेंटर मधील पाच रुग्ण ठणठणीत बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत. त्यामुळे हे सेंटर कोरोना रूग्णांसाठी संजीवनी ठरत आहे.
कोरोना महामारीची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पंकजा मुंडे व खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्या पुढाकारातून अक्षता मंगल कार्यालय येथे लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ३ मे पासून मोफत आयसोलेशन (विलगीकरण) सेंटर सुरू करण्यात आले आहे. पंकजा मुंडे या स्वतः बाधित असताना देखील दररोज सेंटरचा आढावा घेऊन रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचना भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देत आहेत.
याशिवाय डाॅ. हरिश्चंद्र वंगे, डाॅ. शालिनी कराड, डाॅ. एल.डी. लोहिया, डाॅ. विवेक दंडे, डाॅ. संदीप घुगे, डाॅ. दुष्यंत देशमुख, डाॅ. दिपक पाठक, डाॅ. वाल्मिक मुंडे, डाॅ. आनंद मुंडे असे तज्ज्ञ डाॅक्टर्स सुध्दा रूग्णांना कोरोना मुक्त करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
आयसोलेशन सेंटरमध्ये सध्या महिला व पुरुषांसह एकूण ५३ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांचे मनोबल वाढावे आणि त्यांच्यात सकारात्मक उर्जा निर्माण व्हावी यासाठी भाजयुमोचे प्रदेश चिटणीस ॲड. अरूण पाठक हे त्यांना दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत योगा, प्राणायामाचे धडे देतात, शुक्रवारी पंकजा मुंडे या स्वतः रुग्णांसोबत ऑनलाइन योगा, प्राणायाम या क्रियेत सहभागी झाल्या होत्या. योगा प्राणायाम याच्या माध्यमातून प्रतिकार शक्ती वाढते, सकारात्मक उर्जा निर्माण होते त्यामुळे हे आवश्यक आहे, असे सांगत त्यांनी यावेळी रूग्णांचे मनोबल वाढवले.
असा आहे दैनंदिन क्रम
सेंटरमध्ये रूग्णांना सकाळी ८.३० वा. आयुर्वेदिक काढा, नाश्ता, दुपारी १२ वा. व रात्री ८ वा. पौष्टिक भोजन, नाश्ता व जेवणात दररोज वेगवेगळ्या भाज्या, उसळी, मोड आलेले धान्य, फळांचा ज्यूस हे दिले जाते. दिवसभरात डाॅक्टर्स चार वेळेस येऊन रूग्णांची तपासणी करून औषध देतात शिवाय आरोग्य कर्मचारी देखील चोवीस तास याठिकाणी हजर असतात. भाजपचे सर्व कार्यकर्ते रूग्णांची काळजी घेण्याबरोबरच बाधित रूग्णांच्या कुटुंबांना दररोज घरपोंच मोफत जेवण पुरविण्याचे देखील काम करत आहेत. एकूणच हे सेंटर रूग्णांसाठी संजीवनी ठरत आहे.