बीड- शहरातील जालना रोडवर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या दुसऱ्या मजल्यावरील रेकॉर्ड रूमला आज पावणेसहाच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये रेकॉर्ड रूममध्ये ठेवलेली बँकेची महत्त्वाची कागदपत्रे तसेच काही फाईल्स जळाल्या आहेत.
रविवारी बँकेला सुट्टी असल्याने बँकेत कोणी नव्हते. बँकेला बाहेरून कुलूप लागले होते. ही आग इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत धायतडक यांनी दिली आहे. दरम्यान, घटनास्थळी बीड पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले होते. त्यांनी दीड ते दोन तासात आग आटोक्यात आणली. आगीत बँकेतील रेकॉर्ड रूममधील कागदपत्र व फर्निचर जळून खाक झाले आहे.
नागरिकांनी दाखवली सतर्कता
सुरुवातीला एसबीआय शाखेच्या वरच्या मजल्यावरील पाठीमागच्या भागाकडून धूर येऊ लागला. हा धूर नेमका कशाचा होता याबाबत लोकांना समजले नाही. मात्र, काही वेळातच धुराबरोबर आग दिसून आली. इमारतीला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना व अग्निशमन विभागाला फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली. बँकेला लागलेल्या आगीत नेमके काय जळाले याबाबत एसबीआय बँकेचे अधिकारी पाहणी करून सांगणार असल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले. नेमके कोणते कागदपत्र या आगीत जळाले याची तपासणी सुरू आहे.
हेही वाचा- भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ बीडमध्ये एबीव्हीपीचे आंदोलन