बीड - अंबाजोगाई तालुक्यात पूस येथील खाजगी तसेच शासकीय जमीन अनधिकृतपणे स्वतःच्या नावावर केल्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह १४ जणांवर शुक्रवारी सकाळी सात वाजता गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार हे गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती अंबाजोगाई विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली.
या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तत्पूर्वी बर्दापूर पोलीस ठाण्यात मुंडे यांच्यासह १४ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ज्या १४ जणांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, त्यामध्ये मुंडे हे दहाव्या क्रमांकाचे आरोपी आहेत. या प्रकरणात कलम ४२०, ४६८, ४६५,४६४,४७१ कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे प्रकरण -
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात येथील सर्वे नंबर २४, २५ आणि इतर शासकीय जमीन आहे. ही जमीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राजकीय दबाव वापरून स्वत: च्या नावावर केल्याप्रकरणी राजाभाऊ फड या व्यक्तीने मुंडे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. तक्रारीवरून गुन्हा दाखल होत नाही, म्हटल्यावर फड यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी दाखल करण्याबाबत याचिका दाखल केली होती. त्यानुसार खंडपीठाने मुंडे यांना दोषी ठरवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.