बीड - कोरोनाच्या बिकट परिस्थितीत पोलिसांकडून परवानगी न घेता विवाह लावून देणाऱ्या पित्यावर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या लग्नाला 60 ते 70 लोक एकत्र आले होते.
बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सोनपेडवाडी येथे प्रशासनाला कुठलीही माहिती न देताच नियम डावलून मुलीचा विवाह करून देण्याचा प्रकार समोर आला. यावरून नेकनूर पोलीस ठाण्यात मुलीच्या पित्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोनपेडवाडी येथील मालू कारभारी तोंडे असे गुन्हा दाखल झालेल्या मुलीच्या पित्याचे नाव आहे. वंजारवाडी येथील एका मुलाशी आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. या लग्न सोहळ्याला 60 ते 70 जणांची उपस्थितीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सध्या कोरोना विषाणू संक्रमणामुळे दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत या विवाह सोहळ्याची प्रशासनाला कसलीच माहिती दिली नाही, अथवा परवानगी काढली नाही. सरकारी नियम धाब्यावर बसवत हा विवाह सोहळा पार पडला. याप्रकरणी सोनपेडवाडीचे ग्रामसेवक अनंत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वधूपिता मालू कारभारी तोंडे यांच्याविरोधात कलम 188, 269, 270 भादवि स. 51 ब आपत्ती व्यवस्थापन कायदा व महाराष्ट्र covid-19 वि नियमन 2020 चे कलम 11 नुसार नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या विवाह सोहळ्याला हजेरी लावलेल्या 42 जणांना होम क्वारंटाईन केले असून, होम कोरंटाईन कालावधी संपल्यानंतर उर्वरित लोकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली युनुस बागवान व शिंदे हे करत आहेत.