बीड - जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मारहाण झाली. यामध्ये शेजारी असलेली एक वृद्ध महिला रुग्ण खाटेवरून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. ही घटना तीन दिवसांपूर्वी बीडच्या जिल्हा रुग्णालयात घडली.
बीड येथील मुख्य कोविड सेंटरमध्ये कोरोना वॉर्डात दाखल असलेल्या दोन रुग्णांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये शेजारी असलेली एक 55 वर्षीय महिला रुग्ण खाटेवरून खाली पडली. त्यामुळे तिला दुखापत झाली. उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, ज्या वॉर्डमध्ये दोन रुग्णात भांडण झाले, त्या वॉर्डमध्ये ही महिला नव्हती. त्या महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे. नातेवाईक जाणीवपूर्वक आक्रमक होत रुग्णालय प्रशासनावर आरोप करत आहेत.
बीड जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती -
बीड जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार ८४१ झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात १०५ नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ३१९ रुग्ण बरे झाले असून एकूण ४७१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार ४६ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची कोरोना तपासणी; महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक
हेही वाचा -कोरोना दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आरोग्य यंत्रणा अद्ययावत ठेवा - आयुक्त डॉ. विपिन शर्मा