बीड - संपादित केलेल्या जमिनीचे एकत्रीकरण करण्याची मागणी करुनही पाटबंधारे विभागाकडून न्याय मिळत नसल्याने नैराश्यातून अर्जुन साळुंके या शेतकऱ्याने जाळून घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. या शेतकऱ्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान मध्यरात्री अखेर साळुंके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
अर्जुन साळुंके यांची जमीन बीडच्या पाटबंधारे विभागाने संपादित केलेली आहे. त्या जमिनीच्या एकत्रीकरण यासंदर्भात प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे त्यांनी दिलेला आहे. मागील अनेक वर्षापासून जमिनीचे एकत्रीकरण करण्याची मागणी त्यांनी केलेली होती. अनेक वेळा चकरा मारुन देखील पाटबंधारे विभागाकडून न्याय मिळत नसल्याने, मनामध्ये नैराश्याची भावना येऊन अखेर अर्जुन साळुंखे यांनी मंगळवारी बीडच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोरच अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. साळुंखे यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु मंगळवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार दिला आहे.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा..
ज्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आम्ही आमचा माणूस गमावला आहे. त्या दोषी अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका अर्जुन साळुंके यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. यामुळे प्रशासनातील निगरगट्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
काही महिन्यापूर्वी दिला होता आत्मदहनाचा इशारा..
पाटबंधारे विभाग व एकंदरीत जिल्हा प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने अर्जुन यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र याची दखल संबंधीत विभागाने घेतली नाही. अखेर मंगळवारी दुपारी त्यांनी कार्यालयात पेट्रोल ओतून घेत जाळून घेतले. दरम्यान अर्जुन हे शेतकरी 90 टक्के भाजले होते. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रशासनाचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.