बीड - नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ६५ वर्षीय शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी समोर आली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील वाघाळा येथे ही घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज होते.
रोहिदास मुकुंदराव मस्के (रा. वाघाळा वय ६५ ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे .रोहिदास मस्के यांच्याकडे नऊ एकर कोरडवाहू जमीन आहे. या जमिनीवर बडोदा बँकेचे १ लाख २२ हजार रुपये कर्ज थकले होते. 'एल अँड टी फायनान्स'चे साडेचार लाख रुपये कर्ज रोहिदास यांच्याकडे होते. या फायनान्सचे तीन हप्ते थकल्याने ट्रॅक्टर ओढून नेला होता. एकंदरीत दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतून उत्पन्न मिळत नव्हते. या आर्थिक विवंचनेत रोहिदास मस्के यांनी शनिवारी पहाटे विष पिऊन आत्महत्या केली. रात्री पत्नी शेतातील कोट्यात जेवण करुन झोपली होती. मध्यरात्री रोहिदास यांनी विषारी औषध पिले. सकाळी पत्नीने झोपेतून उठवायचा प्रयत्न केला असता ते उठले नाहीत. त्यांचा विषारी औषधांचा वास आल्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. स्वाती रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नेण्यात आला. मृत रोहिदास मस्के यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.