बीड - पाटबंधारे विभागाने संबंधित शेतकऱ्यांची जमीन संपादित करून घेतली होती. मात्र, त्या जमिनीच्या एकत्रीकरणासाठी मागील अनेक वर्षापासून पाटबंधारे विभागाकडे चकरा मारून देखील काम होत नाही म्हटल्यावर अखेर मंगळवारी संबंधित शेतकऱ्याने बीड येथील पाटबंधारे विभागाच्या प्रांगणात अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतल्याची घटना दुपारी तीन वाजता घडली आहे.
अर्जून कुंडलिकराव साळुंके (ता. बीड रा. पाली) असे जाळून घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी आहे की, पाटबंधारे विभागाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्याने एका निराश शेतकर्याने कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याची खळबळजनक घटना दुपारी घडली. जखमी अवस्थेत शेतकर्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेतकर्याने यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेतली नसल्याने शेतकर्याने आज हे टोकाचे पाऊल उचलले.
- जमिनीचे एकत्रीकरण बाबतचा होता वाद-
बीड तालुक्यातील पाली येथील अर्जून कुंडलिकराव साळुंके या शेतकर्याची जमीन पाटबंधारा विभागाने संपादीत केलेली आहे. या जमिनीच्या एकत्रीकरणाबाबतचा वाद आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी पाटबंधारा विभाग कार्यालयाचे उंबरे झिजवत आहे. कार्यालयाकडून न्याय मिळत नसल्याने सदरील शेतकर्याने गेल्या काही महिन्यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र याची दखल संबंधीत विभागाने घेतली नाही. आज दुपारी शेतकर्याने कार्यालयात पेट्रोल ओतून घेत जाळून घेतले. या घटनेने एकच खळबळ उडाली. शेतकर्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.