बीड - परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी एक केंद्रीय पथक जिल्ह्यात येणार आहे. मात्र, हे पथक दाखल होण्याआधीच माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथील शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. नारायण अप्पाराव सोळंके (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा - राज्यभरात मागील दहा महिन्यांमध्ये 2 हजार 225 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राजू शेट्टी संतप्त
नारायण सोळंके यांच्याकडे दहा एकर बागायती शेती आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे ते मागील काही दिवसांपासून चिंतेत होते. सकाळी शेतात काम करण्यासाठी गेले असता, घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, निपाणी टाकळी शिवारातील शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.