बीड- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले स्वतःचे वजन केंद्रात वापरून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करून दाखवावे. असा टोला राज्य महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. मंत्री सत्तार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी सदर विधान केले.
सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. नुकसान पाहणी बरोबरच आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत. आज बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज्य महसूल मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, देशात सर्वाधिक महसूल देणारे राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. अशी परिस्थिती असताना देखील केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुर्लक्षित केले जात आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात आपले वजन वापरावे. कारण दिल्लीला भाजपची सत्ता आहे.
कोरोना संकटाबरोबरच अतिवृष्टीचे संकट मराठवाड्यावर ओढावले आहे. या संकट काळात ठाकरे सरकार शेतकऱ्यांची साथ सोडणार नाही. जिल्ह्यात ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. हे नुकसान अजून वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे, असे आदेश दिल्याचे अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा- वैद्यनाथ बँकेच्या चेअरमनला दहा लाखाची लाच घेतना अटक; औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई