बीड - निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय जर सुरक्षित नसेल तर निवडणूक निर्भय व शांततेच्या वातावरणात कशी पार पडेल, असा प्रश्न अपक्ष उमेदवार व शेतकरी संघटनेचे नेते कालिदास अपेट यांनी उपस्थित केला. शुक्रवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या इशाऱ्यावर बीडचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक काम करत असल्याचा अनुभव गेल्या २ दिवसांपासून बीड जिल्ह्यातील नागरिकांना आला आहे. अशा परिस्थितीत बीडच्या निवडणुका दबावाखाली पार पडत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.
बीड लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार म्हणून मी डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. मात्र, आमचा आक्षेप जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी फेटाळला. याचे लेखी उत्तर देण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक वेळ लावला. आमचा आक्षेप फेटाळल्याचे लेखी उत्तर आम्हाला गुरुवारी तत्काळ मिळाले असते तर आज आम्ही प्रीतम मुंडे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जाऊ शकलो असतो. मात्र, तसे करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. याबाबत लेखी उत्तर न देऊन आपल्याला रोखले असल्याचा गंभीर आरोप कालिदास अपेट यांनी केला आहे.
शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. सायंकाळी साडेचारनंतर अपक्ष उमेदवारांना निवडणूक विभागाच्यावतीने चिन्ह वाटप करण्यात आले. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या अपक्ष उमेदवारांना बीडचे जिल्हाधिकारी दुय्यमपणाची वागणूक देत असल्याचा आरोपदेखील अपेट यांनी केला. एकंदरीत मागील ३ दिवसांपासून प्रशासनाची भूमिका याबाबत मोठी चर्चा बीड जिल्ह्यात होत आहे.