बीड - जिल्हा रूग्णालयामध्ये कोरोना रूग्णासाठी ४०० खाटा उपलब्ध आहे. मात्र रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणखी १५० विस्तारीत खाटासाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला जिल्हा रूग्णालयाकडून देण्यात येत आहे. जिल्हा रूग्णालयाअंतर्गत मुलींचे नर्सिंग हॉस्टेल आणि डोळ्याच्या रूग्णांचा वार्ड याठिकाणी कोरोना रूग्णाचा वार्ड तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी दिली आहे.
बीड शहरात दररोज कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बीड जिल्हा रूग्णालयामध्ये कोरोना रूग्णासाठी २५० खाटा आधीच आरक्षित करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर रूग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेवून यामध्ये १५० खाटा वाढविण्यात आल्या आहेत. तरीही जिल्ह्यात आणि शहरामध्ये कोरोना रूग्णाच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. त्यामुळे भविष्यात वाढलेल्या रूग्णांची संख्या लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेल्या खाटा कमी पडतील. त्यामुळे जिल्हा रूग्णालयाच्या अख्त्यारीत नर्सिंग कॉलेजचे हॉस्टेल आणि डोळ्यांच्या रूग्णांचा वार्ड याठिकाणी कोरोना रूग्णांसाठी वार्ड करण्यात येणार आहे. त्यासाठी खाटा वाढीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात येत आहे. त्यासोबतच बीड शहरातील १२ खासगी रूग्णालय हे कोरोना रूग्णांसाठी आरक्षित करण्यात येत आहेत.