बीड - जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डात काम करणाऱ्या डॉक्टरांना दिलेल्या आयसोलेशन कक्षात कुठलीच सुविधा नाही. रुग्णांच्या किचनमधूनच डॉक्टरांना जेवण दिले जाते. कोरोना वार्डमध्ये काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना आयसोलेशन कक्षात ठेवलेले आहे. मात्र, तिथे सुविधा मिळत नाहीत, असे आरोप करत बीडमधील डॉक्टरांनी मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या बाहेरच आंदोलनाचा पवित्रा घेतला.
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आम्हाला आयसोलेशन कक्षात सुविधा द्याव्यात, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. सध्या कोरोनाचे संकट असताना अचानक डॉक्टरांनी ठिय्या आंदोलनाची भूमिका घेतल्यामुळे जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे. सर्व डॉक्टर जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात जमले असून यात जिल्हाधिकाऱ्यांनीच हस्तक्षेप करावा अशी मागणी करत आहेत. येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना जेवण तसेच पाणी अशा मूलभूत सुविधादेखील मिळत नसल्याचे सांगत डॉक्टर आक्रमक झाले.
संकटाच्या काळात आंदोलन करणाऱ्यांना मिळणार नोटीस -
बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात म्हणाले, की डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सर्व सोयी आहेत. त्यांना ड्युटीच ४ तासाची आहे. वॉर्डात फिल्टर आहेत. मात्र, तरीही या घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच अशा काळात आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना नोटीस देण्यात येतील, असा इशारा थोरात यांनी दिला.