बीड - भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात प्रचार करताना धनंजय मुंडे यांनी अश्लील भाषा वापरल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक संतप्त झाले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर परळी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
हेही वाचा - साताऱ्यातील शरद पवारांची सभा प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी - अमोल कोल्हे
शनिवारी परळीत प्रचाराचा कालावधी संपताच पंकजाताई मुंडे भोवळ येऊन व्यासपीठावर कोसळल्या. त्यानंतर डॉक्टरांची फौज दाखल झाली अन् त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. त्यांची प्रकृती ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, या प्रकारणानंतर पंकजा मुंडे समर्थक संतप्त झाले असून धनंजय मुंडे यांनी अश्लील भाषेत केलेल्या टीकेमुळेच पंकजा यांची मानसिक स्थिती ढासळल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद करा म्हणत मोठा जमाव शहर पोलीस ठाण्यात जमा झाला आहे. याठिकाणी भाजप नेते प्राध्यापक टी. पी. मुंडे, भाजपचे परळी तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे यांच्यासह २०० कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित आहेत. दरम्यान, पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर बदनामीकारक हातवारे करून महिलेची बदनामी केल्या प्रकरणी परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी कलम ५०० (आक्षेपार्ह वर्तन), ५०९ (शाब्दिक छेडछाड) आणि २९४ (अश्लील कृत्य) या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
धनंजय मुंडे यांनी विडा येथील सभेत पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्त्यांनी धनंजय यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, परळी पोलिसांत जुगलकिशोर लोहिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या डोक्यावर शरद पवारांची 'छत्री', राष्ट्रवादीचे कार्टुन