बीड- 'विरोधक इथे कुठे आहेत, ते तर बिहारमध्ये आहेत' असे म्हणत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.
बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे जिल्हा दौऱ्यावर आहे होते. यावेळी गेवराई तालुक्यात मादळमोही शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. आतापर्यंत ज्यावेळी राज्यावर संकट आले, त्यावेळी शरद पवार धावून आलेत आणि आता तर सत्तेत असल्याने शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. बीड जिल्ह्यात कापूस, तूर व सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकट काळी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.