बीड - जिल्ह्यातील परळी येथील प्रभू वैद्यनाथावर लाखो भाविकांची श्रद्धा आहे. परराज्यातून भाविक परळी-वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येतात. मात्र, परळीच्या प्रभू वैद्यनाथाचा बारा ज्योतिर्लिंगांमध्ये समावेश नाही. ही वस्तुस्थिती आहे. परळीला डावलून झारखंडमध्ये असलेल्या वैद्यनाथ मंदिराचा बारा ज्योतिर्लिंगांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने मंत्री धनंजय मुंडे यांनी गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जाहीर भाषणांमधून म्हटले होते की, 'जर आमचे सरकार आले तर आम्ही परळीचा बारा ज्योतिर्लिंगांमध्ये समावेश करू, शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त परळीत लाखो भाविक एकत्र येतात. या भाविकांच्या भावनेचा आदर करत परळीकरांना मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेला शब्द ते केव्हा पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
परळी येथील प्रभू वैद्यनाथाला मानणारा भाविक देशभरात पसरलेला आहे. महाशिवरात्र निमित्त परळी येथे मोठी यात्रा भरते. मात्र, मागील दोन-तीन वर्षात परळी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक नसल्याचे समोर आले. यावर राजकीय वर्तुळात मोठे आरोप प्रत्यारोप झाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रचाराचा हा विषय बनला होता. धनंजय मुंडे यांनी परळीत प्रचारादरम्यान केलेल्या भाषणांमधून परळी-वैद्यनाथाचा बारा ज्योतिर्लिंगांमध्ये समावेश नसल्याचे सांगत म्हटले होते की, 'जर आमची सत्ता आली तर आम्ही परळी-वैद्यनाथ मंदिराचा समावेश देशातील बारा ज्योतिर्लिंगांमध्ये करू त्यांनी दिलेला शब्द मंत्री मुंडे केव्हा पाळणार असा, प्रश्न महाशिवरात्रीच्या निमित्ताने परळीच्या वैद्यनाथाच्या भक्तांनी उपस्थित केला आहे.
परळीला भाजप सरकारच्या काळात जाणीवपूर्वक डावलले असल्याचे देखील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर भाषणांमधून सांगितले होते. आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजेच महाविकास आघाडीची सत्ता आहे. स्वतः धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले असून ते मंत्री ही झाले आहेत. आता परळीच्या वैद्यनाथ भक्तांना दिलेला शब्द मुंडे केव्हा पूर्ण करणार? असा प्रश्न पुढे येत आहे.